खेड बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा हमाल परवाना रद्द
खेड: खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी माणिक मोहिते यांनी सन २०२४-२५ मध्ये झालेल्या संस्थेच्या निवडणुकीत नुतनीकरण करून सादर केलेला हमाल परवाना रद्द करण्यात आला आहे. खेड तालुका सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी सोमवारी (दि १०) हा आदेश दिला आहे.
बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील यांच्या सत्ताधारी गटात सयाजी मोहिते सहभागी झाले आहेत. पूर्वी ते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून समितीत कार्यरत होते.
यापुर्वीही आमचे एक संचालक अशोक राक्षे यांना अशाच प्रकारे ‘टार्गेट’ करण्यात आले होते. मोहिते यांचा परवाना रद्द झाल्याने त्यांचे संचालक पद अथवा बाजार समितीच्या राजकीय घडामोडींवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, संचालक माणिक गोरे यांनी सांगितले.
हे देखील वाचा: राजगुरूनगर: मामाच्या मुलाचा चालत्या बसमध्ये निर्घृण खून; भाच्याला जन्मठेपेसह एक लाख रुपये दंड
खेड कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते हे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या गावातील असून त्यांच्याच पॅनल मधून दोनदा निवडणूक लढवून निवडून आले आहेत. सयाजी मोहिते यांच्या परवाना दाखल्यावर बापु बाळु थिगळे यांनी आक्षेप घेतला होता. त्याची पडताळणी करण्यात आली. संचालक सयाजी मोहिते यांनी मागील निवडणुकी दरम्यान दाखला नुतनीकरण केला. मात्र त्यासाठी किती काम केले आणि किती मोबदला मिळवला याबाबत माहिती दिली नसल्याचे निदर्शनास आले.
विपर्यास करून दाखला मिळवला असा ठपका ठेवत श्री सरमरकर यांनी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील नियम ७(३) मधील नमूद अटींचा भंग केला आहे. असा निष्कर्ष नोंदवून मोहिते यांचा दाखला रद्द ठरवण्यात आला आहे. यावर न्यायालयात दाद मागितली जाईल असे सयाजी मोहिते यांनी सांगितले.











