पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी गणेश कवडे
ओझर : भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या कार्यकारी अध्यक्षपदी गणेश कवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष आणि स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असलेले गणेश कवडे यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार विक्रांत पाटील, राजेश पांडे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुप मोरे, पिंपरी-चिंचवड शहराचे शहराध्यक्ष शंकर जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, पुणे शहराचे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच जिल्हा सरचिटणीस ताराचंद कराळे, संजय रौंदळ, आशिष माळवदकर आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: न्हावरा : प्लास्टिक कंपनीला आगीचा फटका; करोडोंचे नुकसान
गणेश कवडे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ब्रीदवाक्य ‘प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः’ यावर आधारित कार्य करण्याची शपथ घेतली. त्यांनी पुढे सांगितले, “माझ्या कार्यक्षेत्रात, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आणि पुणे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा मोर्चाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी आणि भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे.”
गणेश कवडे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हा युवा मोर्चा आणखी मजबूत होईल आणि भाजपच्या विचारधारेचा प्रसार होईल, अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.











