यवतमध्ये जनजीवन पूर्वपदावर; जमावबंदी हटवली, पोलिसांचा बंदोबस्त कायम
पुणे: दौंड तालुक्यातील यवत गावात मागील काही दिवसांपासून लागू असलेली जमावबंदी अखेर हटवण्यात आली आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे प्रशासनाने जमावबंदी लागू केली होती. मात्र, आता गावातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्याने पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी (६ ऑगस्ट) रात्रीपासून जमावबंदीचे आदेश मागे घेतले आहेत. यामुळे गावातील जनजीवन पुन्हा एकदा रुळावर आले असून, स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
काय घडलं होतं?
२६ जुलै रोजी यवत येथील एका मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी एका तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे गावात पुन्हा तणाव वाढला आणि दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जमावबंदीचे आदेश जारी केले होते.
हे देखील वाचा: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर
गेल्या सहा दिवसांपासून गावात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. गावातील शांतता आणि सौहार्द परत आल्याचे पाहून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे जमावबंदी हटवण्याचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आज सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने आणि व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत.
सध्या यवतमध्ये शांतता असली, तरी खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त अजूनही कायम ठेवण्यात आला आहे. पुढील काही दिवस परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












