एस.टी. प्रवाशांच्या खिशाला फटका! तिकिट दरात १५% वाढ
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) तिकिट दरात १५% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार आहे. विधानसभा निवडणुकांनंतर सुरू असलेल्या या दरवाढीच्या चर्चेला अखेर मुहर लागली आहे.
लवकरच लागू होणार नव्या दरांची अंमलबजावणी
सध्या नव्या तिकिट दरांची अधिकृत अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, एस.टी. महामंडळ लवकरच हा नव्या तिकीट दरांचा निर्णय लागू करणार आहे.
राज्य सरकारची मंजुरी, महामंडळाच्या उत्पन्नात वाढीचा प्रयत्न
एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकारकडे १५% तिकिट दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. गुरुवारी मंत्रालयात झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नव्या दरवाढीचा प्रवाशांवर परिणाम
प्राप्त माहितीनुसार, नवीन तिकीट दर आजपासून लागू होण्याची शक्यता आहे. नव्या दरानुसार, एस.टी. प्रवासाचा सरासरी खर्च ७० ते ८० रुपये होईल. जर आधीचे तिकीट १०० रुपये असेल, तर आता ते ११५ रुपये होणार आहे.












