चाळकवाडीत मराठीभाषा दिनानिमित्त शिवांजली साहित्य महोत्सव
पिंपळवंडी: चाळकवाडी (ता. जुन्नर) येथे मराठीभाषा दिनानिमित्त गुरुवार (दि. २७) पासून बत्तीसाव्या शिवांजली साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष व स्वागत प्रमुख शिवाजीराव चाळक यांनी दिली.
याबाबत बोलताना त्यांनी सांगीतले की, शिवांजली साहित्यपीठ, महाराष्ट्र साहित्य परिषद व अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्यसंस्था शाखा चाळकवाडी यांच्या वतीने गेल्या एकतीस वर्षांपासून या शिवांजली साहित्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून या साहित्य संम्मेलनाचा प्रारंभ गुरुवार (दि. २७) पासून चाळकवाडी – नाणेघाट ते चाळकवाडी असा मराठी भाषा दिंडी व शिलालेख पूजनाने होणार आहे. शुक्रवारी (दि. २८) साहित्य विज्ञान पर्यटन अंतर्गत उपस्थित साहित्यिक खोडद येथील महादूर्बिनिला भेट देणार आहेत.
हे देखील वाचा: रोटरी क्लब च्या माध्यमातून इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेला दोन संगणक भेट
शनिवारी (दि. १ मार्च) ग्रंथदिंडी, ध्वजारोहण, उद्घाटन समारंभ व सन्मान सोहळा, “मराठी भाषा अभिजात झाली” या विषयावर परिसंवाद, शालेय मुलांचे कवीसंम्मेलन, निमंत्रित कवींचे कवीसंम्मेलन, शेकोटी गझल संम्मेलन होणार आहे. रविवारी (दि. २ मार्च) निमंत्रित कवींचे दुसरे कवीसंम्मेलन, “आजचे बालक पालक” कथाकथन, लोकसाहित्याचे अंतरंग, मुक्तसंवाद आदी कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाची सांगता सन्मान सोहळा, समारोप व गाठीभेटी या कार्यक्रमाने होणार असल्याचे शिवाजीराव चाळक यांनी सांगीतले.
चार दिवस चालणाऱ्या या शिवांजली साहित्य महोत्सवास राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले.












