शिक्रापूर येथे भरधाव दुचाकीची धडक; तरुण पादचाऱ्याचा जागीच मृत्यू; पुणे-नगर महामार्गावरील भीषण अपघात; दुचाकीस्वारांना किरकोळ दुखापत, पोलिस तपास सुरू
पुणे: भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत एका तरुण पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावर घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव श्री किसन भीका जाधव (वय 29, रा. समेट डोंगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे आहे.
या प्रकरणी नागेश्वर राहुल जाधव (वय 19, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे; मूळ राहणार समेट डोंगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवला आहे.
हे देखील वाचा: ज्ञानमंदिरमध्ये ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन; एचएससी परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन; कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पनेला पाठबळ
अपघाताची सविस्तर माहिती
अपघाताच्या वेळी श्री किसन जाधव रस्ता ओलांडत होते, त्याचवेळी पुण्याच्या दिशेने दोन युवक भरधाव वेगाने दुचाकीवर येत होते. दुचाकीची जबर धडक बसल्याने श्री किसन गंभीर जखमी झाले. अपघातात दुचाकी चालक देविदास ताठे आणि मागे बसलेला मयूर मस्कर यांना किरकोळ मार लागला.
रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती श्री किसन जाधव यांचा उपचाराआधीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
पोलिस तपास सुरू
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे आणि अंकुश चौधरी करत आहेत.












