थेउर फाटा येथे 40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शाळेची बस अपघातग्रस्त
लोणी काळभोर: पुणे-सोलापूर महामार्गावर थेउर फाटा भागात एक दुर्घटना घडली जेव्हा एंजल शाळेच्या 40 विद्यार्थ्यांना लोणी काळभोर येथील शाळेत घेऊन जाणारी शाळेची बस अपघातग्रस्त झाली. या घटनेत सुदैवाने कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही, मात्र या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंजिरवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची बस लोणी काळभोर येथील एंजल हाय स्कूलकडे निघाली होती. थेउर फाटा चौकात रस्ता ओलांडत असताना चालकाला अचानक झटका आला. बसच्या वेगामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात घुसली.
या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र मुलांमध्ये भीतीचे वातावरण होते. बसमध्ये असलेल्या 40 विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनाने शाळेत पोहोचवण्यात आले. काही मुलांना त्यांच्या पालकांनी घरी नेले आहे. बस चालकाचे कुंजीरवाडी येथील समर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली होती. त्यामुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलीस शिपाई कदम, सुतार, कार्डिले घटनास्थळी उपस्थित होते. तसेच लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ढाकणे आणि पोलीस शिपाई सुलाखे यांनी वाहतूक सुरळीत केली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने बस हटवण्यात आली आहे.
हे देखील वाचा: येरवडा तुरुंगातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपी पळाल्यामुळे पुण्यात खळबळ











