बाणेर येथे हजारो नागरिकांचे चिपको आंदोलन; झाडे वाचवण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय
बाणेर: केंद्र सरकारच्या नदी सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना स्थानिक नागरिकांसह पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व संघटनांनी झाडांना मिठ्या मारून तीव्र विरोध दर्शविला. बाणेर येथील कलमाडी हायस्कूल ते मुळा राम नदी संगमापर्यंत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी रॅली काढून तेथील असलेल्या झाडांना मिठी मारून चिपको आंदोलन केले.
या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे, लद्दाख मधील पर्यावरण प्रेमी सोनम वांगचुक उपस्थित होते. या आंदोलनात हजारो नागरिकांनी सर्व वयोगटातील सहभाग घेतला. प्रशासकीय यंत्रणेला वारंवार सांगूनही सुरू असलेल्या काम बंद होत नसल्याने या चिपको आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंतप्रधानांना पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प घातक असल्याने बंद करण्यात यावा अशा आशयाचे हजारो पत्र लेखन करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी झाडांना मिठ्या मारून फोटो काढून स्टेटस ठेऊन पर्यावरण जागृतीसाठी स्टेटसला ठेवले. शाळेतील मुलांनी पर्यावरण व नदी सुधारण्यावर गाणे म्हणून जनजागृती केली. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही नदीवरील गाणी झुळझुळ नदीचे पाणी म्हणून जनजागृती केली. यात नदीचे प्रदूषण आणि गळचेपी या गाण्यातून मांडण्यात आली. विविध बॅनर व पोस्टर घेऊन पर्यावरणविरोधी होत असलेल्या कामाचा निषेध करण्यात आला.
हे देखील वाचा: धक्कादायक! इंदापूर येथील ६ जणांना हजारो मधमाशांचा चावा, ४ जण गंभीर अवस्थेत जखमी, दोघे बेशुद्ध…
शहरातील नदीची बिकट परिस्थिती पाहता, नद्या देशाच्या रक्तवाहिन्या असून त्या दूषित झाल्यास देश दूषित होईल. नद्यांचा विकास म्हणजे कॅनल करणे किंवा गटार करणे नाही. त्यामुळे मुळा रामनदी संगम परिसरातील विकास कामांना आळा बसेल. राज्य शासनाने आणि पुणे महानगरपालिकेने यासंदर्भात विचार करावा आणि नदीला जिवंत ठेवावे, असे पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले.
आपल्याला जगण्यासाठी नदी आणि वृक्षांची आवश्यकता असून ते वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत याचा मला अभिमान आहे. आपला आवाज लोकशाही मार्गाने राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल आणि ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. श्वास आणि पाण्यापेक्षा कुठलीच गोष्ट महत्त्वाची नाही, त्यामुळे पाणी आणि हवा वाचवण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक म्हणाले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमूनदेखील त्यांच्या भावना ऐकण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातर्फे कोणीही उपस्थिती लावली नाही.












