सदगुरु पालखी सोहळ्याचे प्रस्थान ४ फेब्रुवारीला, ओतुर येथे भव्य समारोप
पिंपळवंडी: संत तुकाराम महाराजांचे सदगुरु बाबाजी चैतन्य महाराज यांची संजीवन समाधी श्री क्षेत्र ओतुर येथे आहे. माघ शुद्ध दशमीच्या अनुग्रह दिनानिमित्त होणाऱ्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवारी (४ फेब्रुवारी) सकाळी ७ वाजता होणार आहे. पालखी वाघजाई नगर, शिरोली, पेठ, मंचर, नारायणगाव, ओझर मार्गे ओतुर येथे पोहोचेल, तर ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता समाधीस्थळी समारोप होईल, अशी माहिती ह.भ.प. राजू भसे यांनी दिली.
पालखी सोहळ्याचे १२ वे वर्ष – शिव चिदंबर सेवा समितीचा उपक्रम
चिदंबर स्वरूप प.पु. उमाकांतभाऊ कुलकर्णी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या पालखी सोहळ्याचे हे १२ वे वर्ष आहे. शिव चिदंबर सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तपपूर्ती सोहळ्यात विशेष पूजन व कीर्तन
या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत –
वीणापूजन: तुकोबा रायांचे वंशज व मा.अध्यक्ष ह.भ.प. रामदास महाराज मोरे व ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते
पादुका पूजन: देहू संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते
पालखी मुक्कामी कीर्तन: ह.भ.प. योगेश महाराज शिर्के, गणेश महाराज घोडेकर, गणेश महाराज शिंदे
समारोप किर्तन: ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे
नारायणगाव येथे भव्य रिंगण सोहळा
या सोहळ्याचा मुख्य आकर्षण बिंदू म्हणजे ना.गाव मार्केट कमिटी येथे होणारा भव्य रिंगण सोहळा. वारकरी संप्रदायातील भाविकांनी मोठ्या संख्येने या पवित्र सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन चिदंबर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.












