राहुल सोलापूरकर पुन्हा वादात; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल
पुणे: अभिनेते राहुल सोलापूरकर पुन्हा वादात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर नुकतेच ते प्रकरण थंड झाले होते. मात्र, रविवारी व्हायरल झालेल्या त्यांच्या नव्या व्हिडीओने ते पुन्हा अडचणीत आले आहेत.
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना वेदांमध्ये चातुर्वर्ण्य वितरण कसे केले आहे, याविषयीची माहिती देताना सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक देण्यात आले होते. परंतु, कर्मानुसार ते ब्रह्मण ठरतात, असे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात असून, अनेकांनी सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
सोलापूरकर यांच्याकडून जाहीर माफी:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याने व्यथित झालेल्या सर्वांची आपण जाहीर माफी मागत आहोत, अशा शब्दांत राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे. त्यासंबंधी प्रसार माध्यमांकडे पाठविलेल्या चित्रफितीत बोलताना ते म्हणतात की, छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची भूमिका करताना एका प्रसंगात वेदांमधील एका वाक्यात चातुर्वर्ण्याचे वितरण कसे ठरते, याचे विश्लेषण केलेले आहे.
हे देखील वाचा: दिवंगत शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ३२ लाखांची मदत; आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आर्थिक साहाय्य
व्यक्तीच्या कर्मानुसार ते ठरते, असा त्याचा अर्थ होतो. या भूमिकेतील नेमके हे वाक्य उचलून काही जण समाजाचे मन कलुषित करत आहेत. समाजात वावरत असताना गेली 40 वर्षे आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर आदी महामानवांपुढे नतमस्तक होऊन त्यांच्यावर व्याख्याने दिली आहेत. त्यांचा आदर्श समोर ठेवून जगत असलेली कोणतीही व्यक्ती त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करू शकत नाही. तरीही या वक्तव्याने कोणाची मने दुखावली गेली असल्यास पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यातील घराभोवती बंदोबस्त वाढवला:
छत्रपती शिवाजी महाराज आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याने अभिनेते राहुल सोलापूरकर हे चांगलेच अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कोथरूड येथील घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
पोलिसांनी त्यांच्या रक्षणार्थ सुमारे दहा अधिकारी आणि 15 ते 20 पोलिस कर्मचार्यांचा बंदोबस्त लावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे तक्रारी आल्या होत्या. या वेळी आयुक्तांनी तक्रारीची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सांगितले होते.












