पुण्यात अपघाताचे सत्र सुरुच; भरधाव दुचाकीच्या धडकेत नागरिकाचा मृत्यू
पुणे: पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हडपसर भागात ही घटना घडली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारावर काळेपडळ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सुधाकर दादाराव झांबरे (वय ८०, रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार रमेश सदाशिव वाडकर (रा. हांडेवाडी रस्ता हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला. याबाबत झांबरे यांच्या पत्नी शांता झांबरे (वय ७०) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुधाकर झांबरे हे १६ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातून निघाले होते. त्या वेळी भरधाव दुचाकीने पादचारी झांबरे यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात झांबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन महिने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.
हे देखील वाचा: आयपीएलच्या थराराला २२ मार्चपासून होणार सुरुवात; कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना
दीर-भावजयचा मृत्यू:
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर-भावजयचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२) आणि रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पाषाण भागात पादचाऱ्याचा मृत्यू:
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आशिषकुमार सर्वानंद उपाध्याय (वय २६, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत आशिषकुमार यांचा भाऊ अभिषेकुमार (वय ३१) यांनी चतु:शृंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास आशिषकुमार पाषाण रस्त्यावरून निघाले होते. त्यावेळी ‘डीआरडीओ’ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या आशिषकुमार यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक श्यामल पाटील तपास करत आहेत.












