महाकुंभ मेळ्यामधील चेंगराचेंगरीत षडयंत्राचा वास; रविशंकर प्रसाद यांचे लोकसभेत खळबळजनक वक्तव्य
दिल्ली: भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी लोकसभेत प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर खळबळजनक वक्तव्य केले. ते म्हणाले, “या चेंगराचेंगरीत षडयंत्राचा वास येत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शरमेने मान खाली घालावी लागणार आहे.” त्यांच्या या विधानामुळे लोकसभेत खळबळ उडाली.
रविशंकर प्रसाद यांचे हे वक्तव्य राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान झाले. त्यांनी पुढे सांगितले की, महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 35 कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे आणि चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास सुरू आहे. सत्य लवकरच समोर येईल, असे त्यांनी आश्वासन दिले.
विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधताना प्रसाद म्हणाले, “कुंभ आणि सनातन धर्माचे नाव ऐकताच काही लोकांना त्रास का होतो? परंतु मी स्पष्ट करतो की, भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” त्यांनी महाकुंभ आणि सनातन धर्मावर होणाऱ्या टीकांचा जोरदार प्रत्युत्तर दिला.
हे देखील वाचा: सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य; राज्य सरकारचा मोठा निर्णय
याशिवाय, प्रसाद यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली, खासकरून सोनिया गांधी यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर. ते म्हणाले, “संविधान वाचवण्याचा दावा करणाऱ्यांनी सर्वोच्च घटनात्मक पदाचा सन्मान करणं शिकायला पाहीजे.” काँग्रेसच्या परंपरेत सर्वोच्च संविधानिक पदाचा अपमान करणं हे असले आहे, असे त्यांनी म्हटले.
प्रसाद यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही भाष्य केले आणि सांगितले की, “काँग्रेस सरकारच्या काळामध्ये भारत पाच सर्वात कमकुवत अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होता, परंतु पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे आणि ती आता जगात पाचव्या क्रमांकावर आहे.”
रविशंकर प्रसाद यांचे हे खळबळजनक वक्तव्य लोकसभेत तातडीनं चर्चेला आलं आणि महाकुंभ मेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर एक नवा वाद उभा केला आहे.












