मित्रांना फोन करून टाटा.. बाय-बाय म्हणत घेतले टोकाचे पाऊल; पंढरपुरात खळबळजनक घटना
यामाई तलावात उडी घेत संपवले जीवन
पंढरपूर: एका तरुणाने आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बोलावले, त्यांच्यासमोरच टाटा.. बाय-बाय म्हणत थेट यामाई तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाची ओळख
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव ऋतिक शंकर कदम (वय २३ वर्षे) असून, तो पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होता.
बुधवारी रात्री ऋतिक यामाई तलाव परिसरात गेला आणि त्याने आपल्या मित्रांना तेथे भेटण्यासाठी बोलावले. मात्र, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता टाटा.. बाय-बाय म्हणत त्याने थेट तलावात उडी घेतली.
मित्रांसमोरच घेतले टोकाचे पाऊल
ऋतिकच्या या अचानक कृतीमुळे त्याचे मित्र हादरले. त्यांनी त्वरित त्याच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली, मात्र यश आले नाही. आज सकाळी पुन्हा शोध घेतल्यावर ऋतिकचा मृतदेह तलावात आढळून आला.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
ऋतिकने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती होण्याची गरज असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत.












