तळेरानच्या निखिल कोकाटेंची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर ऐतिहासिक कामगिरी
जुन्नर: जुन्नर तालुक्यातील तळेरान गावच्या आदिवासी युवक निखिल किसन कोकाटे याने जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई करून इतिहास घडवला आहे. ५,३६४ मीटर (१७,५९८ फूट) उंचीवर पोहोचून निखिलने केवळ वैयक्तिक यश संपादन केले नाही, तर आपल्या आदिवासी समाजाच्या शौर्याची आणि जिद्दीची नवी ओळख निर्माण केली आहे.
एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक हा जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकपैकी एक मानला जातो. निखिलने हे आव्हान स्वीकारून १२ दिवसांच्या कठीण चढाईनंतर हे यश मिळवले. -१४° सेल्सिअस तापमानात आणि कमी ऑक्सिजनच्या परिस्थितीत त्याने केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक कणखरताही सिद्ध केली. उंचीवर चढताना होणारी डोकेदुखी, मळमळ आणि श्वास घेण्यास त्रास यांसारख्या अनेक अडचणींवर मात करत त्याने हे यश संपादन केले.
या ऐतिहासिक कामगिरीसाठी निखिलने गेल्या वर्षभरापासून कठोर परिश्रम घेतले. नियमित धावणे, पोहणे आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांसारख्या शारीरिक तयारीसोबतच त्याने अनेक लहान ट्रेक केले. ध्यास सह्याद्री ॲडव्हेंचर संस्थेने त्याला मोलाचे मार्गदर्शन केले.
हे देखील वाचा: गजा मारणे पार्टी प्रकरण: पुणे पोलिसांवर मोठी कारवाई
निखिलने या ट्रेकमध्ये इतर सात गिर्यारोहकांनाही मार्गदर्शन केले. आपले गिर्यारोहण कौशल्य आणि अनुभव वापरून त्याने या मोहिमेला यशस्वी करण्यात मदत केली.
यापूर्वी निखिलने आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर करून एक मोठी कामगिरी केली आहे. असे करणारा तो पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी युवक ठरला होता.
एव्हरेस्ट बेस कॅम्प हे शिखर निखिलच्या मोठ्या ध्येयाकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्याचे स्वप्न आहे स्वतः एव्हरेस्ट शिखर सर करणे. त्याचे अंतिम ध्येय जगातील सातही खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणे आहे, ज्याला ‘7 समिट्स’ मोहीम म्हणतात.
तळेरानसारख्या दुर्गम भागातून आलेला निखिल आज ‘सात शिखरे’ सर करण्याच्या ध्येयाने प्रेरित आहे. त्याची ही प्रेरणादायी कथा इतर आदिवासी तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देईल.
समाजाकडून कौतुक:
संसदरत्न मा. डॉ. अमोल दादा कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ) म्हणाले, “निखिल कोकाटे याने आदिवासी समाजातून जागतिक स्तरावर झेप घेऊन महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. अशा तरुणांची आपल्या देशाला गरज आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोहोचून त्याने केवळ ‘शिखरावर झेंडा’ फडकवला नाही, तर प्रत्येक आदिवासी तरुणाला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली आहे.”
मा. शरद दादा सोनवणे (आमदार, जुन्नर विधानसभा मतदारसंघ) म्हणाले, “तळेरानसारख्या आदिवासी भागातून निखिल कोकाटे याने दाखवलेली जिद्द आणि चिकाटी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आजच्या तरुणांनी त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.”
मा. प्रदीप देसाई (प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव) म्हणाले, “निखिल कोकाटे यांनी मिळवलेले यश हे आदिवासी विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे एक उत्तम उदाहरण आहे. आम्ही त्याच्या ‘Seven Summits’ मोहिमेसाठी पूर्ण सहकार्य करण्याचा विचार करत आहोत.”
श्री. व सौ. सुलोचना आणि किसन सखाराम कोकाटे (निखिलचे आई-वडील) म्हणाले, “निखिल लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द बाळगून होता. त्याने एवढे मोठे यश मिळवले, हे आमच्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”
सरपंच गोविंद साबळे (तळेरान गाव) म्हणाले, “तळेरानसारख्या लहान गावातून जागतिक पातळीवर नाव पोहोचवणारा निखिल आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा बनला आहे. गावातील इतर तरुणांनीही त्याचे अनुकरण करावे.”
सरपंच अरुणा लांडे (मढ गाव) म्हणाल्या, “निखिल कोकाटे याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. गिर्यारोहण क्षेत्रात आदिवासी तरुणाचे नाव चमकवणे ही खूप मोठी गोष्ट आहे.”













