शिरूर: न्हावरे-तळेगाव ढमढेरे महामार्गावर उरळगाव (शिरूर) येथे जिओ पेट्रोल पंपासमोर एक महिंद्रा जीप आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी (११ डिसेंबर) घडली. मृत युवकाचे नाव विशाल बाळासाहेब राजगुरव (वय-३२, रहिवासी निर्वी ता. शिरूर, जि. पुणे) आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल राजगुरव कामासाठी न्हावरे रोडवर त्यांच्या दुचाकीवरून सणसवाडीकडे जात होते. त्याच वेळी उरळगाव परिसरात जिओ पेट्रोल पंपासमोर तळेगाव ढमढेरे दिशेकडून येणाऱ्या चारचाकी जीपने राजगुरव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात राजगुरव गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी न्हावरेच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार प्रमोद राजगुरव यांनी नोंदवली. पुढील तपास शिरूर पोलिस करीत आहेत.













