नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील नारायणगावातील येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या धवल सुरेश चव्हाण यांच्या मालकीच्या अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड कापडाच्या तीन मजली दुकानाला शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागल्याने दोन ते अडीच कोटींचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 18) पहाटे चार वाजेच्या सुमारास वरच्या मजल्यावरून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले. त्यानंतर दुकानाला लागलेल्या अगीने रौद्ररूप धारण केले होते.
दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायतीच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या अग्निशमन बंबाच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु दुकानाला लागलेली आग भीषण असल्याने जुन्नरवरून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत कापड दुकानाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. दरम्यान राजगुरूनगर, विघ्नहर सहकारी साखर कारखाना व कांदळी येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशामन बंब व जुन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.
कापडाच्या दुकानाला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार आपल्या कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांना मदत केली. पहाटे दुकानाला लागलेली आग सहा तासांच्या कालावधीनंतर सकाळी 11 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले; परंतु त्यानंतरही दुकानच्या दुसर्या व तिसर्या मजल्यावर आगीचा धुमसत असलेला धूर अग्निशमन दल आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.
हे देखील वाचा: कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भारत मोरे यांची निवड: सामाजिक कार्याचा गौरव
वर्हाडी मेडिकलचे नुकसान
अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड दुकानाला लागलेल्या आगीच्या उष्णतेची झळ शेजारी असलेल्या सुरेश सहदेव वर्हाडी यांच्या मालकीच्या वर्हाडी मेडिकलला बसली आहे. आगीत मेडिकलमधी एसी, एअर कर्टन, औषधे, संगणक, फर्निचर, फॅन आदींचे सुमारे 75 लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय दुकानातील मेडिसिन वापरता येणार नाही असे दुकानचे मालक सुरेश वर्हाडी यांनी सांगितले.
व्यवसायात धवल चव्हाण दहा वर्षे मागे
अष्टविनायक कलेक्शन रेडीमेड कपड्याच्या दुकानातील रमजान ईद सणामुळे विक्रीसाठी खरेदी केलेल्या कपड्यांच्या गाठी व रेडीमेड कपडे आगीच्या भक्षस्थानी पडल्याने कापड दुकानची राख झाली. दुकानाला लागलेल्या आगीमुळे दुकान मालक धवल चव्हाण आपल्या व्यवसायात किमान दहा वर्ष मागे गेल्याची चर्चा व्यापारी करत होते.
अग्निशमन बंबाची आवश्यकता
नारायणगावची वाढणारी बाजारपेठ व शहरीकरण विचारात घेता नारायणगाव ग्रामपंचायत ने स्वमालकीची अग्निशमन बंबाची उभारणी करण्याची आवश्यकता असल्याची जनमानसात चर्चा होऊ लागली आहे. ग्रामपंचायत ने ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी केलेली अग्निशमन यंत्रणा मोठ्या आगीच्या ठिकाणी कुचकामी असून मोठ्या अग्निशमन बंबाची आवश्यकता आहे. अनेक वेळा घटनास्थळी जुन्नर नगरपरिषदेचा अग्निशमन दलाचा बंब पोहोचेपर्यंत मोठा कालावधी लागत असल्याने आगीत मालमत्तेचे मोठे नुकसान होते; परंतु स्थानिक पातळीवर अग्निशमन बंब उपलब्ध झाल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकेल.












