नारायणगाव अपघातातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; चाकण परिसरात आरोपीला अटक, अपघातानंतर मोठी कारवाई
नारायणगाव : आज, १७ जानेवारी रोजी नारायणगाव सीमेतील हॉटेल मुक्ताई ढाबाजवळ झालेल्या तिहेरी अपघातात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मॅक्सिमो वाहनाला एका आयशर ट्रकने धडक दिली, ज्यामुळे त्या वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला धडक दिली. या अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आयशर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.
या घटनेच्या गांभीर्याचा विचार करून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला ट्रकचालकाचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस अधिकारी दीपक साबळे आणि अक्षय नवले यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच चाळकवाडी टोल प्लाझाद्वारे आयशर ट्रक चालकाच्या छायाचित्रांची माहिती मिळवून शोध सुरू केला.
हे देखील वाचा: पुणे-नाशिक महामार्गावर भयावह अपघात; आयशर आणि एसटीच्या दरम्यान मैक्सिमो चिरडली, 9 प्रवाशांचा मृत्यू
ट्रकचालक ट्रक घटनास्थळी सोडून चाकणकडे गेला असल्याचे समजल्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने चाकण आणि महाळुंगे एमआयडीसी भागात शोध सुरू केला. महाळुंगे एमआयडीसीला तपासणीदरम्यान तो व्यक्ती हरियाणाकडे पळण्याची तयारी करत असताना गुन्हे शाखेने त्याला पकडले. त्याचे नाव विचारले असता त्याने रोहित कुमार जगमालसिंग चौधरी, वय ३० वर्षे, रहिवासी मोहमदपुर जाट, ता- बावल, जि. रेवाडी, हरियाणा असे सांगितले. आरोपीचा वैद्यकीय तपासणी करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला नारायणगाव पोलीस ठाण्यात सुपूर्द करण्यात आले आहे.
हि कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस शिपाई राजू मोमिन, विक्रम तपकीर, संदीप वारे, पोलीस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर यांनी केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनेच्या गांभीर्याचे लक्षात घेऊन फरार आरोपींच्या तात्काळ अटक प्रक्रियेत घेतलेली तात्काळ कृति हि प्रशंसनीय आहे












