धनंजय मुंडे यांचा राजीनामा; अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
पुणे: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मीक कराड याचे नाव समोर आल्यानंतर, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर, आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 82 दिवसांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या कडे सादर करण्यात आला, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, “धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून, पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आले आहे.”
हे देखील वाचा: संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले; आरोपींनी मृत शरीरावर पाय ठेवला, हसत सेल्फी घेतले, महाराष्ट्र शॉकमध्ये
अजित पवारांची प्रतिक्रिया:
धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी नुकताच त्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिला आहे.”
बैठकीनंतर निर्णय:
धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यापूर्वी सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बैठक घेतली होती. या बैठकीनंतर, देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला, आणि त्यानुसार, अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.












