महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठं गिफ्ट; ८ मार्चला दोन महिन्यांचा हप्ता होणार जमा
मुंबई: आगामी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना एक विशेष गिफ्ट दिलं जात आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, या दिनानिमित्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचा हप्ता जमा केला जाईल.
महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ७ मार्च रोजी, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हा हप्ता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. ५ आणि ६ मार्चपासून याची प्रक्रिया सुरू होईल. आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली की, महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून या हप्त्याची वितरण प्रक्रिया पार पडेल.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “८ मार्च रोजी विधीमंडळाचे विशेष सत्र आयोजित केले जाईल. हे सत्र खास महिला लोकप्रतिनिधींसाठी आणि राज्यातील सर्व महिलांसाठी असेल. यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बाबत महत्त्वाची माहिती दिली जाईल.”
हे देखील वाचा: धनंजय मुंडे यांचा राजीनामा; अजित पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
विधीमंडळात विशेष सत्राच्या निमित्ताने, महिलांसाठी विविध योजनांबाबत माहिती देण्यात येईल. महिला दिनाच्या औचित्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या योजनेंतर्गत, महिलांना मिळणार्या आर्थिक मदतीमुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येईल, असे मंत्री आदिती तटकरे यांनी नमूद केले.












