राज्यात ई-बाईक टॅक्सीला मंजुरी; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: राज्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवत, राज्य मंत्रिमंडळाने ई-बाईक टॅक्सीला अधिकृत परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी चालवण्याची परवानगी दिली जाईल, मात्र पेट्रोल बाईकवर बंदी असेल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
ई-बाईक टॅक्सी प्रोत्साहन योजनेअंतर्गत दहा हजार रुपयांचे अनुदान
राज्य सरकारकडून ई-बाईक टॅक्सी सेवा प्रोत्साहित करण्यासाठी दहा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवीन व्यवसायिकांना संधी मिळणार असून, शहरांमध्ये वाहतूक व्यवस्थेतील गती वाढणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने खास धोरण आखले आहे. यामध्ये
- दोन प्रवाशांमध्ये पार्टिशन असणार
- पावसाळ्यात प्रवासी भिजू नयेत म्हणून पूर्ण कव्हर असलेल्या ई-बाईक्सना परवानगी
- सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त उपाययोजना
हे देखील वाचा: 1 एप्रिलपासून देशभरात मोठे बदल होणार, एलपीजी, यूपीआय, टोल टॅक्ससह अनेक नवे नियम लागू
पंधरा किलोमीटर अंतराची मर्यादा आणि गट नोंदणी बंधनकारक
राज्य सरकारने ठरवलेल्या धोरणानुसार, ई-बाईक टॅक्सी सेवा फक्त पंधरा किलोमीटरच्या अंतरातच उपलब्ध असेल. तसेच, पन्नास बाईक्स एकत्र खरेदी करणाऱ्या कंपन्यांना किंवा संस्थांना यासाठी परवानगी दिली जाणार आहे.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, प्रवासी भाड्याच्या दरांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. आम्ही अंतिम टप्प्यात आहोत आणि लवकरच भाडे निश्चित केले जाईल.
ई-बाईक टॅक्सीमुळे होणारे फायदे
- पर्यावरणपूरक वाहतूक, प्रदूषणात घट
- परवडणारे प्रवास दर, नागरिकांना स्वस्त सेवा
- नवीन रोजगार संधी, व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी
- महिलांच्या सुरक्षेसाठी सुधारित नियमावली
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पर्यावरणपूरक, परवडणाऱ्या आणि सुरक्षित वाहतुकीला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्रातील प्रवासी आणि व्यवसायिकांसाठी हा निर्णय लाभदायक ठरणार आहे.












