महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025-26: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडला निराशा; प्रमुख मागण्या दुर्लक्षित
पिंपरी-चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी १० मार्च रोजी विधानसभेत महाराष्ट्राचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मुंबई आणि पुण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असली तरी पिंपरी-चिंचवडसाठी कोणताही मोठा प्रकल्प जाहीर करण्यात आलेला नाही.
लाडक्या बहिणींच्या हप्त्यात वाढ नाही: महिला वर्गाला अपेक्षा होती की, लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या हप्त्यात वाढ होईल. मात्र, अर्थसंकल्पात याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी दुर्लक्ष: पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना नदी सुधार प्रकल्प आणि मेट्रो मार्गिकेच्या मागण्या महत्त्वाच्या होत्या. पवना नदी सुधार प्रकल्पासाठी 1435 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, राज्य आपत्ती निवारण निधी अंतर्गत 580 कोटींच्या निधीची मागणी महापालिकेने केली होती. मात्र, या मागण्यांवर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
हे देखील वाचा: माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का
तसेच, नाशिक फाटामार्गे मोशी-चाकण मेट्रो मार्गिकेची मागणीही अपूर्ण राहिली आहे. या मागण्यांवर कोणताही निर्णय न घेतल्याने पिंपरी-चिंचवडसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला आहे.
राजकीय पार्श्वभूमी: पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जात होता. अजित पवार यांनी या शहराच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. मात्र, यावेळी अर्थसंकल्पात शहरासाठी कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही.
ग्रामस्थांची अपेक्षा: पिंपरी-चिंचवडसाठी पवना नदी सुधार प्रकल्प आणि मेट्रो मार्गिकेच्या मागण्या पूर्ण झाल्यास शहराचा विकास अधिक गतीने होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.











