महाकुंभ 2025: प्रयागराजमध्ये भाविकांचा महापूर, ३० किमी रांगा आणि वाहतूक जामची भीषण परिस्थिती
प्रयागराज: उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या महापर्वाच्या गर्दीमुळे प्रयागराजमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या प्रयागराजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर ३० किलोमीटरपर्यंत वाहतूक जाम आहे. यात मुले, वृद्ध आणि इतर भाविक अडकले आहेत, आणि त्यांना पाणी आणि अन्नसुद्धा मिळत नाही.
रेल्वे स्थानकावर अराजक
प्रयागराज रेल्वे स्थानकावरही गर्दीची परिस्थिती आहे. गर्दी पाहता अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अडकलेले भाविक रेल्वे ट्रॅकवरूनच त्यांच्या गंतव्यस्थानाकडे जात आहेत. सोशल मीडियावर याबाबतचे विडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात रेल्वे स्थानकावरील अराजक दिसून येत आहे.
अखिलेश यादवांचे सरकारला आवाहन
या परिस्थितीवर सपा सुप्रीमो अखिलेश यादवांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले आहे, “महाकुंभात सर्वत्र भुकेले, तहानलेले, दुःखी आणि थकलेले यात्रेकरू दिसत आहेत. राज्य सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणे आणि तातडीने व्यवस्था करणे आवश्यक आहे.” त्यांनी सरकारला आपत्कालीन व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे.
हे देखील वाचा: दिवंगत शिरीष महाराज मोरेंच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ३२ लाखांची मदत; आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आर्थिक साहाय्य
वाहतूक जामची भीषण परिस्थिती
लखनौकडून प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ३० किलोमीटर जाम आहे, तर रेवा रोडकडून १६ किलोमीटर जाम आहे. वाराणसीपासूनही १२-१५ किलोमीटर अंतरावर वाहतूक कोंडी आहे. यामुळे भाविकांना मागेही जात येत नाही आणि पुढेही जात येत नाही.
सामान्य जीवनावर परिणाम
या गर्दीमुळे केवळ भाविकच नाही तर शहरातील सामान्य जीवनही बाधित झाले आहे. रेल्वे स्थानकावर इतकी गर्दी आहे की लोक ट्रेनच्या इंजिनमध्येही घुसले आहेत. या परिस्थितीत येणाऱ्या काळात प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांनी परिस्थितीचा अंदाज घेऊनच प्रवास करावा, अशी शिफारस करण्यात येत आहे.












