पाण्याच्या स्टोरेजमध्ये अडकलेल्या बिबट मादीला वन विभागाने दिले जीवदान
ओतूर: पानसरेवाडी (ओतूर) येथे पाण्याच्या स्टोरेजमध्ये अंदाजे तीन महिन्यांची बिबट मादी अडकली असल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने बचाव मोहीम राबवून तिला सुखरूप बाहेर काढले.
तात्काळ मदत आणि यशस्वी बचाव मोहीम
सदर घटना गावाचे उपसरपंच प्रशांत डुंबरे यांना समजल्यानंतर त्यांनी वन विभागाला सूचना दिली. वनपाल सारिका बुट्टे, वनरक्षक विश्वनाथ बेले, दादाभाऊ साबळे, कैलास भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि बिबट्या अडकल्याची खात्री केली.
वन विभाग व ग्रामस्थांच्या सहकार्याने रेस्क्यू ऑपरेशन
वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांना कळविल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आळे रेस्क्यू टीम, वन कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने बिबट मादीला पिंजऱ्याच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बिबट मादी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल
बचावानंतर बिबट मादीला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षितरित्या हलवण्यात आले. वन विभागाच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे या वन्यजीवाला जीवदान मिळाले, असे ग्रामस्थांनी सांगितले.












