न्हावरा : प्लास्टिक कंपनीला आगीचा फटका; करोडोंचे नुकसान
शिरूर: शिरूर तालुक्यातील शिरुर-चौफुला महामार्गारील न्हावरा येथील घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असलेल्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली आहे. या आगीत कंपनीतील मशनरी, कच्चा माल, फर्निचर व इतर साहित्य मिळून 5 कोटीं पेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुलाब पोपट पडवळ (वय 40 वर्ष, रा. बोरीपार्धी (आनंद हेरीटेज) ता. दौड, जि. पुणे) यांनी याबाबत खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलाब पडवळ यांची मालकीची प्लास्टिक कंपनी न्हावरा येथे असून, दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिरुर चौफुला महामार्गावर न्हावरा येथे घोडगंगा साखर कारखाना शेजारी असलेल्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. 12 यु.एस. 1994 ने धडकली. या धडकेत विद्युत रोहित्र खाली पडले आणि शॉर्टसर्किट झाले.
हे देखील वाचा: शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवाच्या काळात वाहतुकीत बदल
या अपघातामुळे त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीतही शॉर्टसर्किट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि मोठ्या प्रमाणात ज्वाला आणि धूर निघू लागला. पाहता पाहता संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कंपनीचे मालक गुलाब पडवळ व मॅनेजर योगेश आरोटे तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील व शिरूर नगर परिषद अग्निशमन दलाला बोलावले. तसेच बाजूला असणाऱ्या बांधकामावरील पाण्याचे टँकर बोलावून घेतले.
साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. परंतु तोपर्यंत कंपनीतील 5 कोटीं पेक्षा जास्त रुपयांच्या मशनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला. शिरूर पोलीस स्टेशन येथे जळीताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन बी जाधव करीत आहेत.










