कात्रज डेअरीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची उद्या निवड; खेड तालुक्याला संधी मिळण्याची शक्यता
पुणे: पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड उद्या (गुरुवार, दि. १३) सकाळी ११ वाजता होणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत या वेळी संधी ही खेड तालुक्याकडे जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
विद्यमान अध्यक्ष भगवानराव पासलकर हे वेल्हा तालुक्यातून संघावर प्रतिनिधित्व करीत आहेत. संघाच्या कोंढापुरी येथे असलेल्या पशुखाद्य कारखान्यातील पशुखाद्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून व मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करून पशुखाद्याच्या विक्रीमध्ये १५० मे. टन प्रति महावरून सुमारे ५०० मे. टन इतकी प्रति महा वाढ केलेली आहे.
हे देखील वाचा: राजगडमधील शेकडो रेशनधारकांची नावे चक्क उत्तर प्रदेशात
सन २३-२४ मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दर फरक प्रति लीटर रुपये २ प्रमाणे रक्कम रुपये १२ कोटी ५० लाख अदा केलेला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेकडून दोन कोटींची सीमाभिंत संघाला मिळवून देण्यात पासलकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
पुणे जिल्हा दूध उत्पादक संघावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील १६ संचालकांची कमिटी कार्यरत आहे. या कमिटीची मुदत आणखी दोन वर्षे इतकी आहे. संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर आणि उपाध्यक्षांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले आहेत.












