14 किलो सोन्यासह अभिनेत्री रान्या रावला अटक; बंगळुरू विमानतळावर मोठी कारवाई, 14 दिवसांची न्यायिक कोठडी
बंगळुरू : कर्नाटकमधील बंगळुरू शहरात मोठी सोनं तस्करी उघडकीस आली आहे. केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या रावकडून १४.२ किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत १२.५६ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. रान्या रावच्या घरावर करण्यात आलेल्या झडतीमध्ये देखील २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी रान्या रावला अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायिक कोठडी सुनावली आहे.
३ मार्च रोजी अभिनेत्री रान्या राव दुबईहून उशिरा बंगळुरू विमानतळावर पोहोचली होती. यावेळी महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली आणि तिच्याकडून १४.२ किलो सोनं जप्त केले. विशेष म्हणजे, रान्या रावने चिकटपट्टीच्या सहाय्याने सोन्याच्या बिस्किटांना तिच्या मांडीला चिकटवले होते आणि त्यावर वैद्यकीय पट्टी गुंडाळली होती, त्यामुळे कोणालाही संशय यावा अशी काळजी घेतली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अभिनेत्रीने गेल्या १५ दिवसांत ४ वेळा दुबईला भेट दिली होती, त्यामुळे तिच्यावर विशेष लक्ष ठेवले जात होते. विमानतळावर कारवाईनंतर रान्या रावच्या घरावर झडती घेण्यात आली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर सोनं आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
हे देखील वाचा: इंजिनियर यतीनकुमार हुले यांचे शेवंती उत्पादन; दहा गुंठ्यातून घेतला यशस्वी नफा
रान्या राव ही भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी रामचंद्र राव यांच्या सावत्र मुली आहे. रामचंद्र राव हे कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिनेत्री रान्या रावने ‘माणिक्य’ आणि ‘पाटकी’ सारख्या कन्नड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.











