जुन्नर, दौंडमध्ये बिबट्यांचा हैदोस; दोन कुत्री व घोडा ठार
आपटाळे/खुटबाव: पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि दौंड तालुक्यांमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही तालुक्यांत बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या दोन गंभीर घटना समोर आल्या आहेत. जुन्नरमधील वैष्णवधाम, गवारवाडी वस्तीमध्ये बिबट्याने एका घरातील दोन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडला, तर दौंडमधील पारगाव येथे मेंढपाळाच्या ५० हजार रुपये किमतीच्या घोड्याला ठार केले.
जुन्नरमधील आपटाळे येथील घटना मध्यरात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाजीराव गवारी यांच्या अंगणात मध्यरात्री दीड वाजता बिबट्याने कुत्र्यांवर हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे, मध्यरात्री दीड वाजल्यानंतर पुन्हा पावणेतीन वाजता देखील बिबट्या याच परिसरात मनसोक्त वावरत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. वैष्णवधाम, काले, दातखिळेवाडी परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
दुसरी घटना दौंड तालुक्यातील पारगाव येथे घडली. गट क्रमांक १८३० मधील पडीक शेतीत पाल ठोकून असलेल्या खोर येथील मेंढपाळ आबा यशवंत पिसे यांच्या २०० मेंढ्यांच्या कळपाजवळ बिबट्याने मध्यरात्री तीन वाजता हल्ला केला. बिबट्याने बांधलेल्या घोड्याच्या मानेचा चावा घेतल्याने घोडा जागीच मृत पावला आणि त्यानंतर त्याच्या पोटाचा मागील भाग खाऊन फस्त केला.
हे देखील वाचा: जुन्नर आणि पुणे वनविभागात होणार भव्य निवारा केंद्रे; AI-ड्रोन-कॅमेरा ट्रॅप्सचा वापर: वाचा सविस्तर
मंगळवारी सकाळी पिसे कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला माहिती दिली. पशुवैद्यकीय विभाग व वन विभागाने तातडीने घटनेचा पंचनामा केला आहे. शेतकरी मारुती बोत्रे यांनी सांगितले की, पूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता वारंवार दिसू लागला आहे. यामुळे मानवी वस्तीवर आणि पशूंवर याचा परिणाम होत असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री बाहेर पडणे अशक्य झाले आहे.
या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक नागरिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “शासन केवळ कागदोपत्रीच मानव-बिबट संघर्षावर उपाययोजना करणार आहे की प्रत्यक्षात उपाययोजना कधी सुरू होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
जुन्नर आणि दौंड दोन्ही ठिकाणी नागरिकांनी तातडीने पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची आणि वाढत्या बिबट-हल्ल्यांपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देऊन प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
💡 मुख्य मुद्दे (Key Points)
जुन्नरमधील गवारवाडी येथे बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांना ठार केले.
या हल्ल्याची घटना मध्यरात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
दौंड तालुक्यातील पारगाव येथे मेंढपाळाचा ५० हजार किमतीचा घोडा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला.
जुन्नर-दौंड परिसरात बिबट्याचा वावर आणि हल्ल्यांची संख्या वाढल्याने भीतीचे वातावरण.
नागरिक “कागदोपत्री उपाययोजना” करण्याऐवजी प्रत्यक्ष कार्यवाहीची मागणी करत आहेत.
वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.












