टीम इंडियाला मोठा झटका! प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
क्रिकेट चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा मुख्य आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीतून बाहेर झाला आहे. बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. बुमराह स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झाली होती दुखापत… टीम इंडिया काही महिन्यांपूर्वी बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती. बुमराहला या मालिकेतील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाठीला दुखापत झाली होती. बुमराहला या दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर बुमराहवर आवश्यक ते उपचार करण्यात आले होते. तसेच चाचणीही करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुमराह परतला होता. मात्र त्याला दुखापतीमुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती.
बुमराहची फिटनेस स्थिती… टीम इंडिया मायदेशात परतल्यानंतर काही दिवसांपूर्वी बुमराहचे रिपोर्ट काढण्यात आले. त्यानुसार मंगळवारी 11 फेब्रुवारीला बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही? हे माहीत होणार होतं. बुमराह फिट झालेला असावा, तो चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळावा, अशी अनेक क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती. मात्र शेवटी बुमराहला दुखापतीमुळे खेळता येणार नाही, असं बीसीसीआयकडून 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी जाहीर करण्यात आलं.
हे देखील वाचा: फुले एज्युकेशन तर्फे महिला शिक्षक दिन सुरू केल्याबद्दल तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानित
बुमराह ऐवजी हर्षित राणा… दरम्यान जसप्रीत बुमराह याच्या जागी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात हर्षित राणा या युवा गोलंदाजाचा समावेश करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. हर्षित राणा याची इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅकअप म्हणूनही समावेश करण्यात आला आहे. बुमराह इंग्लंडविरुद्ध पहिल्या 2 एकदिवसीय सामन्यांत खेळू शकणार नाही, असं निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर बुमराह संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला. त्यामुळे हर्षितला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
बुमराह बाहेर झाल्याने त्याच्या जागी शार्दूल ठाकुर किंवा मोहम्मद सिराज या दोघांपैकी एकाला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या जवळचा असल्याने हर्षितला संधी मिळाली, असंही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.












