धक्कादायक! इंदापूर येथील ६ जणांना हजारो मधमाशांचा चावा, ४ जण गंभीर अवस्थेत जखमी, दोघे बेशुद्ध…
इंदापुर: इंदापुर तालुक्यातील पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या सहा जणांवर हजारो मधमाशांचा हल्ला झाला. या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून, दोन जण बेशुद्ध अवस्थेत आहेत. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात मोठा गोधळ उडाला.
जखमींना तातडीने वाईच्या दवाखान्यात आणण्यात आले. याची माहिती वाई पोलिसांना व वाई पंचायत समितीमधील वाई तालुका वैद्यकीय कक्षाला कळवण्यात आली. यानंतर तात्काळ पाच रुग्णवाहिकांसह वैद्यकीय टीम घटनास्थळी पोहोचली.
हे देखील वाचा: भोरमध्ये दोन दुकानांना आग, लाखोंचे नुकसान
या घटनेत हजारो मधमाशा चावल्याने अल्हाद दंडवते, निखिल क्षीरसागर, गोपाळ आवटी, गोपाळकर दंडवते व इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय टीमने तातडीने पाच किलोमीटर डोंगर चढून घटनास्थळी पोहोचून जखमींचा शोध घेतला आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू केले. त्यानंतर त्यांना पाच किलोमीटर पाऊलवाटेने खाली आणून पुढील उपचारासाठी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
घटनेनंतर गडावर गर्दी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार, डिबीचे विभागाचे नितीन कदम, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सी.बी. जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर यांच्या वैद्यकीय टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.












