ज्ञानमंदिरमध्ये ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन; एचएससी परीक्षा 2025 साठी विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन; कॉपीमुक्त परीक्षेच्या संकल्पनेला पाठबळ
आळेफाटा: हायर सेकंडरी सर्टिफिकेट (एचएससी) फेब्रुवारी-मार्च 2025 परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह 20 जानेवारीपासून ज्ञानमंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, आळे येथे सुरू झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांनी नकलमुक्त परीक्षेची शपथ घेतली. त्याचबरोबर स्थानिक जनप्रतिनिधी, विद्यालय विकास व व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि गावातील मान्यवर नागरिक यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.
आज महाविद्यालयाच्या मैदानात सर्व विद्यार्थी एकत्र येऊन परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली. तसेच, परीक्षेत प्रामाणिक प्रयत्न करून उत्तीर्ण होण्याचा संकल्प केला. यावेळी उपप्राचार्य कुऱ्हाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर दाभाडे सर यांनी शपथ वाचन केले. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा: घोटी-सिन्नर महामार्गावर अपघात, कंटेनर-रिक्शाच्या धडकेत तिघांचा मृत्यू; इगतपुरीतील दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडी, पोलिसांची तत्काळ मदत
कॉपीमुक्त अभियान अंतर्गत उपक्रम:
22 जानेवारी: विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेवरील निर्देशांचे महत्त्व पटवून देणे.
23 जानेवारी: परीक्षेदरम्यान योग्य आहार व आरोग्य याबद्दल जनजागृती.
24 जानेवारी: विद्यार्थी तणावमुक्त राहण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि बोर्डाद्वारे तयार केलेला विशेष मार्गदर्शक व्हिडिओ सादर करणे.
25 जानेवारी: कॉलेज स्तरावर नकलविरोधी घोषणा देत जनजागृती फेरी काढण्यात येणार.
26 जानेवारी: ग्रामसभेच्या बैठकीत प्राचार्य पालकांना ‘कॉपीमुक्त अभियान’ बद्दल मार्गदर्शन करतील.
या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेचा निकाल अधिक सकारात्मक होईल.












