हिंजवडी आग प्रकरण: चालकाच्या सुडाने चार कर्मचाऱ्यांचा बळी घेतला; दिवाळी पगार न दिल्याने पेटवली ट्रॅव्हल्स
पिंपरी : हिंजवडी येथे व्योम ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाला आग लागून चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. बुधवारी (दि. १९) सकाळी झालेल्या या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. या वाहनावरील चालकाने कर्मचाऱ्यांबरोबरील वाद आणि पगार वाढ न झाल्याच्या रागातून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. चालकाने देखील गुन्ह्याची कबुली दिल्याने औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जनार्दन हंबर्डीकर (५६, रा. कोथरूड, मूळ रा. गोवा) असे आरोपी चालकाचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हिंजवडीतील व्योम ग्राफिक कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हलरवर चालक म्हणून काम करतो. दरम्यान, बुधवारी सकाळी सकाळी साडेआठ वाजता हिंजवडी येथिल विप्रो सर्कल फेज एकच्या परिसरात अचानक या टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली. या आगीत चार कर्मचाऱ्यांचा गाडीतच होरपळून मृत्यू झाला. तर, सहा कामागार गंभिररीत्या भाजले. तसेच, चार कर्मचाऱ्यांनी गाडीतून उड्या घेत आपला जीव वाचविला. प्रथमदर्शनी वाहनात शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच जुन्या रागातून आणि कंपनी प्रशासनाच्या नाराजीतून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
बेशुद्ध पडल्याचे नाटक केल्याने संशय
आरोपी चालक हंबर्डीकर याला भाजून झालेल्या जखमा आणि तो दाखवत असलेल्या वेदना यात तफावत दिसत होती. किरकोळ जखमी होऊनही तो पोलिसांना पाहून वारंवार शुद्ध हरपल्याचे नाटक करत होता. ही बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्या लक्षात आली. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, तरीही तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान, घटनास्थळाजवळील एका कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये चालक गाडीच्या सीटखाली काहीतरी पेटवत असल्याचे पुसटसे दिसून आले. त्यावरून पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
हे देखील वाचा: नारायणगावातील अष्टविनायक कलेक्शन कापड दुकान शॉर्टसर्किटमुळे भस्मसात, दोन कोटींचं नुकसान
अपमानास्पद वागणूक जिव्हारी
आरोपी चालक हंबर्डीकर याला कंपनीतील इतर कर्मचारी अपमानास्पद वागणूक देत होते. त्याला दोन दिवसापूर्वी डब्यातील चपातीही खाऊन दिली नाही. तसेच दिवाळीत त्याचा पगार कापला होता. हा सर्व राग आणि खुन्नस डोक्यात असल्याने ही कृती केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.
राग तिघांवर ; होरपळले भलतेच
गाडीत बसलेल्या तीन जणांवर आरोपी चालकाचा राग होता. त्यांना इजा पोहचविण्यासाठी त्याने हा प्रकार केला. त्याला कंपनीच्या जवळ किंवा कंपनीच्या परिसरात गाडी पेटवायची होती. मात्र, गाडी थांबवून, आग लावून पळता येईल अशी जागा पाहून त्याने आग लावली. मात्र, ज्या तिघांवर राग होता, ते तीन कर्मचारी वाचल्याचे पोलिस सांगत आहे. ज्यांचा या सर्व गोष्टीशी काहीही संबंध नव्हता, असे चारजण या घटनेत होरपळून मृत्यू पावले आहेत.
मृत्यू झालेल्यांची नावे
शंकर कोंडीबा शिंदे (वय ६३, रा. सिद्धीविनायक आंगण सोसायटी, नऱ्हे), गुरुदास खंडू लोखरे (वय ४५, रा. हनुमाननगर, कोथरूड), सुभाष सुरेश भोसले (वय ४४, रा. त्रीलोक सोसायटी, वारजे), आणि राजन सिद्धार्थ चव्हाण (वय ४२, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक) अशी आगीत होरपळून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर, जनार्दन हंबर्डीकर, विश्वास खानविलकर, चंद्रकांत मलजी, प्रविण निकम, संदीप शिंदे, विश्वास जोरी हे या घटनेत भाजले असून त्यांनी उपचारासाठी हिंजवडीतील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले आहे. तर, विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदिप राऊत हे कर्मचारी सुरक्षीतपणे ट्रॅव्हलच्या बाहेर पडले आहे.
हिंजवडीत कंपनीच्या गाडीला आग लागून चार लोकांचा मृत्यू झाला. ही आग चालकाने लावल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. चालकावर उपचार सुरू आहेत. यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का याची देखील चौकशी सुरू आहे. आरोपी चालकवर हिंजवडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन












