हिंजवडीत भीषण अपघात! रेडीमिक्स डंपर पलटला, दोन तरुणींचा जागीच मृत्यू
हिंजवडी (पुणे): हिंजवडी-माण रस्त्यावर वडजई नगरच्या वळणावर शुक्रवारी (24 जाने.) दुपारी 4 वाजता भीषण अपघात झाला. रेडीमिक्स काँक्रीटने भरलेला डंपर पलटल्याने दुचाकीवरील दोन तरुणींना जागीच मृत्यू आला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
डंपर पलटला, दुचाकीस्वारांना चिरडले
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या दोन तरुणी दुचाकीवरून प्रवास करत होत्या. वडजई नगरच्या वळणावर येताच डंपरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि डंपर रस्त्यावरच उलटला. दुर्दैवाने त्या तरुणी डंपरखाली आल्या आणि जागीच ठार झाल्या.
अपघातानंतर घटनास्थळी हिंजवडी पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. क्रेनच्या मदतीने डंपर हटवून तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृत तरुणी IT इंजिनीअर?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या मृत तरुणी IT क्षेत्रातील अभियंता असण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप त्यांच्या ओळखीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या दुर्घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.












