गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं-चांदी महागले; ग्राहकांच्या खिशाला फटका
मुंबई: गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाच्या स्वागताचा सण असल्याने या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्यास नागरिक विशेष प्राधान्य देतात. मात्र, यंदाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.
सोन्याच्या दराने 90,000 रुपयांचा टप्पा ओलांडला असून, गुडरिटर्न्सनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार 24 कॅरेट सोनं 89,164 रुपये, 22 कॅरेट 81,674 रुपये, 18 कॅरेट 66,873 रुपये, तर 14 कॅरेट 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. आठवड्याच्या सुरुवातीला सोनं 540 रुपयांनी स्वस्त झालं होतं, मात्र त्यानंतर सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात वाढ झाली. बुधवारी 110 रुपये, गुरुवारी 440 रुपये आणि शुक्रवारी 1140 रुपये अशी एकूण 1690 रुपयांची महागाई झाली आहे.
हे देखील वाचा: नारायणगाव येथे दुचाकीस्वारांवर बिबट्याचा हल्ला एक जखमी
चांदीच्या दरातही मोठी उसळी
फक्त सोन्याच नाही तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत चांदीच्या दरात फारसा फरक नव्हता, मात्र त्यानंतर तीन दिवसांत चांदी 4,000 रुपयांनी महागली. सध्या एक किलो चांदीचा दर 1,05,000 रुपये आहे.
ग्राहकांची होरपळ, मात्र गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी
सोनं-चांदी महागल्यामुळे ग्राहक निराश आहेत, मात्र गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोने आणि चांदीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
आपण सोनं-चांदी खरेदी करणार आहात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.












