किल्ला पाहणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघात; पाय घसरल्याने मृत्यू, जुन्नर तालुक्यातील दुर्दैवी घटना
जुन्नर: जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाटजवळ जीवधन किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचे नाव विकी लक्ष्मण राठोड, वय २०, रा. भाटनगर, पिंपरी चिंचवड आहे. ही घटना शनिवारी २८ तारखेला सायंकाळी सुमारे ४ वाजता घडली.
या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणारा विकी राठोड आणि त्याचे चार मित्र पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी २७ तारखेला श्रीक्षेत्र भीमाशंकरचे दर्शन घेऊन ते सर्वजण शिवनेरी किल्ल्यावर गेले आणि संध्याकाळी धामणखेल येथे मित्र अनुराग रघतवान यांच्या घरी थांबले.
त्यानंतर शनिवारी २८ तारखेला सकाळी १० वाजता जुन्नर येथून जीवधन किल्ला पाहण्यासाठी गेले. किल्ला पाहून खाली येताना सायंकाळी ४ ते ५ च्या दरम्यान राठोड ५० ते ६० फुटांच्या उंचीवरून खाली पडला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले.
हे देखील वाचा: आमदार शरद सोनवणे यांची महत्त्वाची घोषणा
त्याचप्रमाणे जुन्नर वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ आणि जुन्नर रेस्क्यू टीमच्या मदतीने राठोडला स्ट्रेचरवरून किल्ल्यावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर त्याला अॅम्ब्युलन्समधून जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तपासणीनंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक रेंगडे यांनी राठोडला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












