आकुर्डीतील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्बची अफवा; विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
पुणे: आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीवजा ई-मेल आल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ई-मेलमध्ये महाविद्यालय उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर पोलिस आणि बॉम्बस्कॉडने महाविद्यालय परिसरात तातडीने तपासणी केली.
सध्या परीक्षांचे सत्र सुरू असल्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्यामुळे, या धमकीने खळबळ उडाली. महाविद्यालय प्रशासनाने त्वरित पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी पोलीस, बॉम्बस्कॉड आणि डॉगस्कॉड दाखल झाले. जवळपास तीन तास चाललेल्या तपासामध्ये कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू सापडली नाही. त्यामुळे ही घटना केवळ खोडसाळपणामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
विद्यार्थ्यांना तातडीने वर्गाबाहेर काढले: धमकीचा ई-मेल आल्यानंतर, प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव तातडीने वर्गाबाहेर काढले. या घटनेमुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. पोलिस आणि बीडीडीएस पथकाने पूर्ण परिसराची कसून तपासणी केली. कोणताही धोका नसल्याची खात्री झाल्यावरच विद्यार्थ्यांना परत वर्गात जाण्याची परवानगी देण्यात आली.
हे देखील वाचा: फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा: मेट्रो, महामार्ग, सागरी वाहतूक आणि गुंतवणूक
सायबर पोलिसांचा तपास सुरू: या खोडसाळ ई-मेलसंदर्भात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर विभागाच्या साहाय्याने ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. खोडसाळपणामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांवर पडलेल्या मानसिक ताणाबद्दल प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.
खोडसाळपणामुळे निर्माण झालेली भीती: तपासणीनंतर हा धमकीचा ई-मेल केवळ खोडसाळपणाचा भाग असल्याचे समोर आले. यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जीव भांड्यात पडला. मात्र, या प्रकरणामुळे खोट्या धमकीच्या घटनांबद्दल जनजागृती आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे.












