पुणे-नाशिक महामार्गावरील अपघातप्रकरणी ट्रकचालक १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, एस.टी. बसचालक जामिनावर मुक्त
नारायणगाव: दिनांक १७ जानेवारी, शुक्रवार सकाळी १० वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेल्या हरियाणा राज्यातील आयशर ट्रकचालक राहुल कुमार जगमालसिंह चौधरी (वय ३०) याला खेड सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच, एस.टी. बसचालक भाऊसाहेब भास्कर जयभाई (वय ४०) याला जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.
ट्रक चालकाला न्यायालयीन कोठडी, एस.टी. बसचालक जामिनावर मुक्त
अपघातानंतर पोलीस कोठडी संपल्यानंतर आज दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. अपघातानंतर जनक्षोभ उफाळून येऊ नये यासाठी एस.टी. बसचालक जयभाई याला नारायणगाव पोलिसांनी तातडीने अटक केली होती. तसेच, अपघातानंतर फरार झालेल्या आयशर ट्रकचालक चौधरीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी १७ जानेवारीच्या संध्याकाळी चाकण येथे अटक केली. याबाबतची माहिती सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
हे देखील वाचा: मुंबई ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा राज्यस्तरीय विजय!
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय
सरकारी वकीलांच्या वतीने आरोपी ट्रकचालकाच्या जामिनाला विरोध करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा अपघात झाल्याचे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले. दुसरीकडे, एस.टी. बसचालक जयभाई हा अपघातानंतर पळून न जाता, जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत करत होता, असे वकील केतन कावळे यांनी न्यायालयासमोर सांगितले. यामुळे न्यायालयाने एस.टी. बसचालकाला जामीन मंजूर केला, तर ट्रकचालकाला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला.
पोलीस तपास सुरूच, पुढील सुनावणी लवकरच
या गंभीर अपघातानंतर पोलीस अधिक तपास करत असून, पुढील सुनावणी लवकरच होणार आहे. वकिल देशपांडे यांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद केला.











