संतोष देशमुखांच्या फोटोमुळे युवकाची आत्महत्या; कुटुंबीयांना मोठा धक्का
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो माध्यमांमध्ये झळकल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या फोटोमुळे केज तालुक्यातील जाणेगाव येथील अशोक हरिभाऊ शिंदे (वय 23) या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले.
संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर केज येथे बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये अशोक शिंदे यांनीही सहभाग घेतला होता. बंदनंतर घरी परतल्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
भावनिक निर्णय: आत्महत्येपूर्वी अशोक शिंदे यांनी पुण्यात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीला फोन करून आपल्या मनातील अस्वस्थता व्यक्त केली होती. “मला टोकाचा पाऊल उचलावसं वाटत आहे,” असे त्यांनी सांगितले. बहिणीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र अशोक यांनी आपले जीवन संपवले.
हे देखील वाचा: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025: उपांत्य फेरीत भारतीय संघाने पद्माकर शिवलकर यांना श्रद्धांजली अर्पण केली
कुटुंबीयांचे सांत्वन: या दुर्दैवी घटनेनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी जाणेगाव येथे जाऊन अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी सांगितले की, “संतोष भैय्यांचे फोटो पाहिल्यावर अशोक भावना विवश झाले. दोषींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपण एकत्र राहिले पाहिजे.”
अशोक शिंदे यांच्या कुटुंबीयांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे सांगितले. त्यांच्या भावाने सांगितले की, “अशोकचा कॉल आला होता, पण मी उचलू शकलो नाही. नंतर गळफास घेतल्याची बातमी मिळाली.”











