Pune Rural Police President Medal: पुणे जिल्ह्याच्या सुपुत्राला राष्ट्रपती पदक; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचा गौरव
📍 पुणे | 🗓️ 26 जानेवारी 2026 | ✍️ प्रतिनिधी | शिवनेर टाईम्स न्यूज
पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलासाठी अभिमानाची बातमी आहे. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या ३२ वर्षांच्या उल्लेखनीय, कर्तव्यनिष्ठ आणि धडाकेबाज सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने देशभरातील पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली.
ग्रामीण भागातून देशपातळीवरील सन्मानापर्यंतचा प्रवास
भोर तालुक्यातील तांबड, गुंजन मावळ हे अविनाश शिळीमकर यांचे मूळ गाव. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. सन १९९३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात रुजू होत त्यांनी खाकी वर्दीचा प्रवास सुरू केला.
मुंबईतील येलो गेट, वडाळा, एल. टी. मार्ग पोलीस ठाणे, त्यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखा आणि सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत अशी विविध ठिकाणी त्यांनी प्रभावी सेवा बजावली आहे. त्यांचा एकूण सेवा कालावधी तब्बल ३२ वर्षांचा आहे.
गुन्हेगारी टोळ्यांवर थेट मैदानात उतरून कारवाई
पुणे ग्रामीणमध्ये कार्यरत असताना ऊरुळी कांचन परिसरातील कुख्यात आप्पा लोंढे टोळीवर कारवाई करून परिसरातील गुन्हेगारीला मोठा आळा घालण्यात आला. नागपूर शहरात कार्यरत असताना खून, दरोडा, खंडणीसह ३८ गंभीर गुन्हे उघडकीस आणत कुख्यात राजा गौस टोळीचा पर्दाफाश करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तसेच संतोष आंबेकर टोळीवर कारवाई करून नागपूर शहरातील दहशत संपुष्टात आणण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला.
शेतकऱ्यांसाठी थेट मैदानात उतरले अधिकारी
अहिल्यानगर जिल्ह्यात कार्यरत असताना शेतकऱ्यांच्या जनावरांची व शेतीमाल चोरी करणाऱ्या सराईत टोळ्यांचा छडा लावत चोरीचा मुद्देमाल शेतकऱ्यांना परत मिळवून देण्यात त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला.
कोरोना काळातही जबाबदारीची जाणीव
कोरोना महामारीच्या काळात पुणे ग्रामीण आणि अहिल्यानगरमध्ये कार्यरत असताना स्थलांतरित मजुरांसाठी उपाययोजना, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गाजलेली प्रकरणे आणि ठोस तपास
नोव्हेंबर २०२२ पासून पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, आंतरराज्यीय गुन्हेगार टोळ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
यवत येथील एका कुटुंबातील सात जणांच्या मृत्यूचा गुन्हा आत्महत्या नसून खून असल्याचे सिद्ध करणे, सासवड तहसील कार्यालयातील ईव्हीएम चोरीचा छडा लावणे, तसेच हायवेवरील लुटमार करणाऱ्या टोळ्यांना जेरबंद करणे ही त्यांची ठळक कामगिरी ठरली आहे.
अवैध अग्निशस्त्र, अमली पदार्थ जप्ती, मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाई, दंगल नियंत्रण आणि निवडणूक काळातील बंदोबस्त अशा सर्वच बाबींमध्ये त्यांनी प्रभावी नेतृत्व दाखवले आहे. यापूर्वी २०२४ मध्ये पोलीस महासंचालक पदकानेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. राष्ट्रपती पदकामुळे पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.











