महाराष्ट्रात चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई
आळेफाटा: आळेफाटा पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्रात चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीला जेरबंद केले आहे. गोध्रा हत्याकांडातील आरोपी पॅरोलवर फरार होऊन महाराष्ट्रात चोरी करत असल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपींकडून १४.४० लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपशील:
दि. ७ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास आळेफाटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आणे (ता. जुन्नर) गावात ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर टायर चोरीचा प्रकार उघडकीस आला होता. फिर्यादी सोमनाथ गायकवाड (वय ३०, व्यवसाय: चालक, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हे भिवंडी येथून जे.के. टायर्स इंडस्ट्रीजचे १६५ टायर घेऊन सोलापूरला जात असताना रस्त्याच्या कडेला थांबले. त्या वेळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या मागील ताडपत्री आणि रस्सी कापून २,४९,६२२ रुपये किमतीचे ४० टायर लंपास केले.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मंचर आणि सिन्नर पोलिस ठाण्यांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे घडल्याचे निष्पन्न झाले. चोरीची पद्धत सारखीच असल्याने पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला.
टोळीचा शोध आणि अटक:
गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना ही टोळी गुजरातमधील गोध्रा येथील असल्याची माहिती मिळाली. आरोपींचे मोबाईल लोकेशन ट्रॅक करून पोलिसांनी मोठी कारवाई करत चांदवड (जि. नाशिक) येथून पाच जणांना अटक केली.
हे देखील वाचा: वानखेडेवर अभिषेक शर्माचा तडाखा! भारताने इंग्लंडसमोर उभा केला 248 धावांचा डोंगर
अटक आरोपी:
- सलीम उर्फ सलमान युसुफ जर्दा (वय ५५) – गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी, ८ वेळा पॅरोलवर फरार
- साहील हनीफ पठाण (वय २१)
- सुफीयान सिकंदर चॅदकी (वय २३)
- आयुब इसाग सुनठीया (वय २९)
- इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१)
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो (GJ-14-X-8853) तसेच चोरीचा एकूण १४,४०,८७८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोध्रा हत्याकांडातील आरोपी पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय
या गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेल्या सलीम जर्दा याला गोध्रा हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो तुरुंगात परत न जाता टोळी तयार करून महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये चोरीच्या गुन्ह्यांत सक्रिय झाला.
पोलीस पथकाची यशस्वी कामगिरी
या कारवाईत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने कामगिरी बजावली.
तपास पथकात –
- सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर
- सहा. फौजदार चंद्रा डुंबरे
- पो. हवा विकास गोसावी, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित पोळ, अमित माळुंजे, नवीन अरगडे, सचिन रहाणे, ओंकार खुणे, गणेश जगताप यांचा सहभाग होता.
या धडक कारवाईमुळे महाराष्ट्रातील महामार्गांवरील चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता आहे.










