नवीन वर्षात एसटीच्या ताफ्यात 3500 नवीन लालपरी बसेसचा समावेश होणार: भरत गोगवले
नागपूर: एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या नव्या वर्षात एसटीच्या बसेसची कमतरता दूर होणार आहे. कारण आता नव्या वर्षात एसटीमध्ये सुमारे 3500 साध्या बसेस चालविण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगवले यांनी दिली. त्यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे नव्या वर्षात प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागणार नाही. तसेच प्रवासादरम्यान बसेस बिघडल्यामुळे होणारा त्रास देखील संपणार आहे.
सध्या एसटी महामंडळाच्या साध्या बसेसची संख्या कमी झाली आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात 14 हजार बसेस आहेत. कोरोना काळापूर्वी 2018 साली एसटीच्या ताफ्यात 18 हजार बसेस होत्या. मात्र, कोरोना काळातील आर्थिक संकट आणि इतर कारणांमुळे एसटी महामंडळाने काही वर्षे नवीन बसेस खरेदी केल्या नाहीत. एसटीच्या जुन्या बसेसची मुदत संपल्यामुळे त्यांना ताफ्यातून काढून टाकण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना अतिरिक्त बसेस मिळण्यात अडचणी येत होत्या. म्हणूनच एसटी महामंडळाने 2200 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि 1300 बसेस भाड्याने घेण्याचेही ठरविले आहे. अशा प्रकारे सुमारे साडेतीन हजार बसेस पुढील वर्षापासून टप्प्याटप्प्याने एसटी महामंडळात दाखल होणार आहेत.
हे देखील वाचा: थेउर फाटा येथे शाळेची बस अपघातग्रस्त
एसटी महामंडळाने एसटी महामंडळाच्या सर्व बस स्थानकांना टप्प्याटप्प्याने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सरकारच्या काळात, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने एमआयडीसीच्या मदतीने राज्यभरातील 183 बस स्थानके आणि त्यांच्या परिसराचे काँक्रीटीकरण सुरू केले होते. भरत गोगवले यांनी हे देखील सांगितले की, गणेश पेठ बस स्थानकाला भविष्यात विदर्भातील एक सुंदर बस स्थानक म्हणून नामांकित करण्यात येणार आहे.











