समर्थ कॉम्प्लेक्समध्ये राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन, विद्यार्थ्यांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद
बेल्हे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्गत आणि समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन लिज्जत पापड समूहाचे माजी व्यवस्थापक सुरेश कोते यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सुरेश कोते म्हणाले, “लिज्जत पापड समूह मागील 40 वर्षांपासून कार्यरत असून, आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत कधीही तडजोड करत नाही. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञान आणि बाजारपेठ समजून घेतल्यासच व्यवसाय टिकवून ठेवता येतो. योग्य अनुभव आणि कौशल्य हे यशस्वी होण्याच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतात.”
हे देखील वाचा: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना: अर्ज परत कसा घ्यावा? संपूर्ण माहिती
विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकासाचे महत्त्व
आजच्या तरुणांनी शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. रघुलीला इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक विकास दांगट यांनी कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींबाबत मार्गदर्शन केले.
याच कार्यशाळेतील दुपारच्या सत्रात तरुण उद्योजक प्रमोद दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय करताना कोणत्या कौशल्यांची गरज भासते, याविषयी माहिती दिली.
व्यावसायिक यशासाठी आवश्यक कौशल्ये
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, कोणत्याही व्यवसायात यश मिळवायचे असल्यास संवाद कौशल्य, नेतृत्व क्षमता, व्यवस्थापन कौशल्ये आणि मानवी मूल्ये समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उद्योगावर होणाऱ्या परिणामांबाबतही विद्यार्थ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात कशा संधी उपलब्ध आहेत, यासंबंधी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
पर्यटन व उद्योग क्षेत्रातील करिअर संधी
पर्यटन क्षेत्रात रोजगाराच्या संधी कशा निर्माण होऊ शकतात, यावर पराशर कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी मार्गदर्शन केले.
या सत्रात कवी संदीप वाघोले यांनी “सुखी जीवनाची गुरुकिल्ली” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान दिले आणि काही सुंदर कविता सादर केल्या.
हे देखील वाचा: लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी माहिती समोर आली आहे
विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन
विद्यार्थ्यांना व्यावसायिक क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून राजुरी येथील सात्विक डी फूड, एमआयडीसी वडगाव कांदळी येथील दाते पॉलिमर्स-प्लास्टिक इंडस्ट्री आणि हस्ताई कोल्ड स्टोरेज पॅकेजिंग या ठिकाणी औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले.
या दौऱ्यात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यशाळेत मान्यवरांची उपस्थिती
या कार्यशाळेत संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉ.निलिमा फोकमारे, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव, प्रा.कल्याणी शेलार, प्रा.गणेश बोरचटे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












