बारामतीतील तरुणीचा जीबीएस सिन्ड्रोममुळे मृत्यू, तीन आठवड्यांचा संघर्ष
बारामती : पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात शिक्षणासाठी गेलेल्या बारामतीच्या २१ वर्षीय किरण राजेंद्र देशमुख हिचा जीबीएस सिन्ड्रोममुळे मंगळवारी मृत्यू झाला. गेल्या तीन आठवड्यांपासून हि तरुणी या आजाराशी झुंज देत होती. मात्र, तिचा संघर्ष अखेर जीबीएसच्या पुढे टिकू शकला नाही. या घटनेमुळे बारामती आणि परिसरात शोक व्यक्त होत आहे.
किरण देशमुख हे बारामतीतील एक गरीब कुटुंबीय असून तिचे वडील रिक्षाचालक आहेत. काही दिवसांपूर्वी किरणला जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला, ज्यामुळे तिला त्वरित बारामतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला. पुण्यात तिच्या तपासणीत जीबीएस सिन्ड्रोमने ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले.
हे देखील वाचा: किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांवर मधमाशांचा हल्ला; 10 ते 15 जण जखमी
या दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तिच्या आजाराची माहिती दिली गेली, त्यानंतर त्यांनी किरणला पुण्यातील नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु, तीन आठवड्यांच्या उपचारांनंतर मंगळवारी तिचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, सिंहगड रोड परिसरात असताना किरणने पाणीपुरी खाल्ली होती, त्यानंतरच तिला जुलाब आणि अशक्तपणाची समस्या सुरू झाली होती. त्याचे कारण कोणते होते हे सांगता येत नाही, परंतु तिच्या उपचारादरम्यान तिची स्थिती हळूहळू खालावत गेली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, “बारामतीत अजूनपर्यंत जीबीएस सिन्ड्रोमचा एकही रुग्ण आढळलेला नाही.”
किरणच्या मृत्यूमुळे बारामतीतील नागरिक शोकसंतप्त आहेत आणि तिच्या कुटुंबियांसाठी सहानुभूती व्यक्त केली जात आहे.












