नितीमुल्यांची ढासळलेली स्थिती: बाबा आढाव यांचे आवाहन
मंचर : आजकालची तरुण मुलं कोयता घेऊन मारामारी करताना दिसत आहे, हे सगळं अवघड झालं आहे. देशाचे ब्रीदवाक्य सत्यमेव जयते असून हे वाक्य आज पणाला लागले आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक शब्द वापरला यामागे मोठे कारण आहे. प्रत्येक भारतीयाला सत्यशोधण्याचा अधिकार आहे. समाजाची नितीमुल्ये ढासळली तर तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी पुढे येऊन बोलणे गरजेचे आहे,असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथे श्री शारदा सरस्वती महोत्सवानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना मॉ भगवती शारदा सरस्वती पुरस्काराने माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले, नामदेव महाराज वाळके, सुभाष मोरमारे, भरतशेठ भोर, जयसिंग काका काळे, विश्वस्त गोविंद खिलारी, गणेश कोकणे, रामदास सावंत, मोहन कोळपकर, नारायण बोनवटे, विठ्ठल भास्कर, रामदास महाराज काळे, दिलीप ढमढेरे, प्रभाकर कठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे लेखापाल नवीनचंद्र शहा यांचा अमृत महोत्सवानिमित्त माजीमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव म्हणाले, श्री शारदा प्रबोधिनी संस्थेच्या वतीने या ठिकाणी सरस्वती देवीची मूर्ती बसवण्यात आली असून सरस्वती ही विद्येची ज्ञानाची देवी असून वारकरी संप्रदायाला नवीन दिशा देणारे कार्य शारदा प्रबोधिनी संस्थेने केले आहे.
या कार्यक्रमापूर्वी ह.भ.प.महंत प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे कीर्तन संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार येवले, मानपत्राचे वाचन डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी केले. तर आभार राजेंद्र बोडे यांनी मानले.
हे देखील वाचा: शिरीष महाराजांचे आत्महत्येपूर्वीचे हृदयद्रावक शब्द: तुझं आयुष्य…!!!
बाबांचे कार्य मोठे…
माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा जीवनपट सांगितला. ते म्हणाले की, डॉ. बाबा आढाव यांचे पूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव, पुणे शहरात यांचा जन्म झाला असून त्यांनी मेडिकलचे शिक्षण घेतले होते. राष्ट्रसेवा दलाचे ते संघटक होते. १९५२ साली बाजारभावाच्या विरोधात सत्याग्रह आंदोलन केल्यामुळे त्यांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता. १९५३ साली त्यांनी स्वतःच्याच घरात दवाखाना सुरू केला, १९५५ साली त्यांनी साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली. १९५६ मध्ये पुण्यात हमालपंचायतीची स्थापना, पुण्यात विकास व्याख्यानमाला प्रौढ साक्षरता वर्ग चालवले. बाबा आढाव यांचे कतृत्व महान असल्याचे त्यांनी सांगितले.












