🐾 औंध परिसरात बिबट्या गेला कुठं? रात्रभर शोधमोहिमेनंतरही वनविभागाच्या हाती काहीच लागेना
पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्या दिसल्याच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये पसरलेली भीती कायम आहे. औंध परिसरात रात्रभर वनविभागाची शोधमोहीम सुरू होती. मात्र, कोणतीही ठोस माहिती किंवा बिबट्याचे पायाचे ठसेही न आढळल्याने तो नेमका कुठे गेला, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर वनविभागाने तातडीने या भागात कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, काल पहाटे ४ नंतर प्रत्यक्षदर्शी किंवा पुराव्यासहित बिबट्या दिसून आलेला नाही. कॅमेऱ्यातही संबंधित बिबट्या दिसलेला नाही, तसेच बिबट्याच्या पायाचे ठसेसुद्धा आढळून आलेले नाहीत. त्यामुळे औंध परिसरातील बिबट्या नेमका कोणत्या दिशेने गेला, याचा तपास वनविभाग करत आहे.
हे देखील वाचा: जुन्नर आणि पुणे वनविभागात होणार भव्य निवारा केंद्रे; AI-ड्रोन-कॅमेरा ट्रॅप्सचा वापर: वाचा सविस्तर
काल रात्री वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून या भागात थर्मल ड्रोनच्या मदतीने गस्त घालण्यात आली. ड्रोनच्या साह्याने रात्रभर तपासणी केल्यानंतरही त्यांना कुठेही बिबट्या दिसून आला नाही. त्यामुळे नागरिकांनी केवळ सतर्क राहावे, परंतु कोणतीही अनावश्यक भीती बाळगू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने सोशल मीडियावर होणाऱ्या अफवांबद्दल गंभीर इशारा दिला आहे. काही जण कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या मदतीने बिबट्याचे बनावट फोटो तयार करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अशा प्रकारे खोटी व दिशाभूल करणारी माहिती, फोटो किंवा मेसेज सोशल मीडियाद्वारे पसरवू नयेत, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर विद्यमान शासकीय नियमावली व कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशाराही वनविभागाने दिला आहे.
Key Points
शोधमोहीम: औंध येथील ब्रेमेन चौक परिसरात बिबट्या दिसल्याच्या माहितीनंतर वनविभागाने रात्रभर शोधमोहीम राबवली.
पुरावे नाहीत: शोधमोहिमेत कोणत्याही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आला नाही, तसेच पायाचे ठसेही आढळले नाहीत.
गस्त: वन विभागाने बिबट्याचा शोध घेण्यासाठी रात्री थर्मल ड्रोनचा वापर केला.
जनतेस आवाहन: नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र बिगर-आवश्यक भीती बाळगू नये, असे वनविभागाचे आवाहन.
AI अफवा: कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) बनवलेले बिबट्याचे खोटे फोटो व्हायरल न करण्याचे आणि अफवा न पसरवण्याचे आवाहन.
कायदेशीर इशारा: खोट्या बातम्या व फोटो पसरवणाऱ्यांवर कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.










