सपना वाघ यांची BMC मध्ये सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड!
बेल्हे: बेल्हे (ता. जुन्नर) येथील तरुणी सपना शशिकांत वाघ हिने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मार्फत घेण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठित परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने सहायक कार्यकारी अधिकारी (Assistant Executive Officer) हे महत्त्वाचे पद प्राप्त केले आहे.
सपनाने कृषी क्षेत्रात पदवी संपादन केली असून, लहानपणापासूनच अभ्यासात सातत्य ठेवले. तिच्या याच जिद्दी आणि मेहनतीच्या जोरावर तिला हे उल्लेखनीय यश मिळाले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या या परीक्षेचा निकाल नुकताच बुधवार, दि. ९ रोजी जाहीर झाला. लवकरच, पुढील दोन महिन्यांत तिला नियुक्तीचे आदेश मिळतील आणि ती आपल्या नवीन पदावर रुजू होईल.
हे देखील वाचा: ट्रम्प यांचा चीनला ‘गेम प्लॅन’! १२५% कराचा बडगा, ७५ देशांना ९० दिवसांची मुदत
सपना एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आपले आई-वडील, कुटुंब, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणी यांना दिले आहे. या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले, असे तिने नम्रपणे सांगितले.
सपनाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल बेल्हे गावातील नागरिकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.












