पुणेकरांना महागाईचा झटका! सीएनजी दरात पुन्हा वाढ; वाहनचालक त्रस्त
पुणे: पुणे शहर आणि आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) साठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ने शहरात तसेच पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांमध्ये सीएनजीच्या किरकोळ दरात पुन्हा वाढ केली आहे. ही दरवाढ ८ एप्रिल आणि ९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लागू झाली आहे.
नवीन दरानुसार, सीएनजीचा प्रति किलोचा किरकोळ दर आता ८९ रुपयांवरून ८९.७५ रुपये झाला आहे. याचबरोबर, घरगुती वापराच्या पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) च्या दरातही वाढ झाली असून, तो प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (एससीएम) ४९.९० रुपयांवरून ५०.६५ रुपये झाला आहे. त्यामुळे आता सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांना आपल्या खिशाला अधिक भार सोसावा लागणार आहे.
सहा महिन्यात तिसरी दरवाढ:
विशेष म्हणजे, गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत सीएनजीच्या दरात वारंवार वाढ झाली आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त असल्याने अनेक नागरिक सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना अधिक पसंती देतात. पुणे शहरात सुमारे तीन लाखांहून अधिक सीएनजीवर धावणारी वाहने आहेत, ज्यात चारचाकी गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. यंदाच्या गुढीपाडव्यालाही सीएनजी वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली होती.
हे देखील वाचा: पुणे जिल्ह्यात कुस्तीचा थरार! वडगाव काशीबेगमध्ये मुलींच्या कुस्त्या ठरल्या आकर्षणाचे केंद्र
परंतु, आता सीएनजीच्या दरात सातत्याने होणारी वाढ वाहनचालकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. मागील सहा महिन्यांत सीएनजीच्या दरात जवळपास तीन ते साडेतीन रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे सीएनजी वाहनांचा आर्थिक फायदा आता कमी होताना दिसत आहे.
एमएनजीएल प्रशासनाने दरवाढीचे नेमके कारण स्पष्ट केलेले नाही, परंतु आंतरराष्ट्रीय बाजारातील नैसर्गिक वायूच्या किमती आणि इतर खर्चांमध्ये झालेली वाढ हे यामागील प्रमुख कारण असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वारंवार होणाऱ्या या दरवाढीमुळे सीएनजी वाहनधारक नाराजी व्यक्त करत असून, शासनाने यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ते करत आहेत.
पुण्यात सीएनजीच्या दरात झालेली ही वाढ नागरिकांच्या दैनंदिन खर्चात आणखी भर टाकणारी ठरली आहे.












