नापसंत नवऱ्याला संपवण्याचा कट उघड! महिलेने दिली दीड लाखाची सुपारी; 6 जणांना अटक
यवत: लग्नापूर्वीच होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचा धक्कादायक कट उघडकीस आला आहे. महिलेने गुंडांना दीड लाख रुपयांची सुपारी देऊन हा प्रयत्न केला, परंतु यवत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या. ही घटना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीत 27 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती.
कसा रचला कट?
सागर कदम आणि मयुरी दांगडे यांचा विवाह ठरला होता. परंतु, मयुरीला सागर पसंत नव्हता. त्यामुळे तिने सागरला संपवण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी दिली. आरोपींनी खामगाव फाट्यावर सागरला अडवून “तू मयुरीशी लग्न केलेस तर तुला दाखवतो” असे म्हणत लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. सागरने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
तपासादरम्यान, पोलिसांनी आदित्य दांगडे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने मयुरी आणि संदीप गावडे यांच्या सांगण्यावरून गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी इतर चार आरोपींनाही अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.
हे देखील वाचा: 1 एप्रिलपासून देशभरात मोठे बदल होणार, एलपीजी, यूपीआय, टोल टॅक्ससह अनेक नवे नियम लागू
महिला आरोपी फरार
या प्रकरणात पाच आरोपींना अटक झाली आहे, तर मुख्य आरोपी मयुरी दांगडे अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 61 (2), 126 (2) या कलमांची वाढ करण्यात आली आहे.
पोलिसांचे पथक
ही कामगिरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांच्या पथकाने केली.










