आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी पर्यटन विभागाकडे; तज्ज्ञांची समिती स्थापन होणार, शासनाने काढला जीआर
मुंबई: शिवजयंतीच्या दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची घोषणा केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) निर्गमित करण्यात आला असून, यामुळे आगामी काळात स्मारक उभारणीस गती मिळण्याची शक्यता आहे.
स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये इतिहास तज्ज्ञ, जाणकार आणि अन्य तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी, जमीन अधिग्रहण आणि अन्य संबंधित बाबी पर्यटन विभागाकडे सोपवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ या प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी मुख्य यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि त्यांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करा, या उद्देशाने हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, अशी ऐतिहासिक घटना ध्यानात घेत, त्या ठिकाणी स्मारक उभारले जाणार आहे.
हे देखील वाचा: पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी उभे राहणार ‘रोप वे’; पर्यटनाला मिळणार मोठी चालना
या स्मारकात अत्याधुनिक सुविधांसह संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आणि इतर उपक्रम राबवले जाणार आहेत. या ऐतिहासिक ठिकाणी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर मांडला जाईल.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मुघलशाहीने नजरकैदेत ठेवलं होतं, मात्र आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने त्यांनी स्वतःला आणि आपल्या मावळ्यांना मुक्त केलं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पर्यटक आग्र्यात जाण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र या ठिकाणी यापूर्वी कोणतीही स्मारक किंवा संग्रहालय नसल्याने हा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहचत नव्हता.
राज्य शासनाने या ऐतिहासिक ठिकाणाचे संरक्षण, जतन आणि विकास करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारच्या अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक घटनांवर आधारित स्मारकांच्या उभारणीमुळे इतिहासाची जाणीव आणि प्रेम पुढील पिढ्यांपर्यंत पोहचवण्यास मदत होईल.












