रोटरी महिला सन्मान सोहळा २०२५: नारायणगावात विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान
नारायणगाव – रोटरी क्लब नारायणगावच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित “रोटरी महिला सन्मान सोहळा २०२५” वसंत व्हिला सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रोटरी क्लबचे अध्यक्ष हेमंत महाजन यांनी या सोहळ्याची माहिती दिली. सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या माजी प्रांतपाल रो. मंजू फडके उपस्थित होत्या. त्यांच्यासह विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मोनिका अनिलतात्या मेहेर, राजकीय क्षेत्रातील ग्रामपंचायत नारायणगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच डॉ. शुभदा पंकज वाव्हळ, शैक्षणिक क्षेत्रात चाळीस पेक्षा अधिक वर्षे योगदान देणाऱ्या राजश्री मंगलकुमार चिंतामणी, वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत फिजिओथेरपिस्ट डॉ. दिक्षा दीपक वारूळे (दोनाडकर), उद्योग व्यवसाय क्षेत्रात सोनाली एंटरप्रायजेसच्या माध्यमातून बटाटा व केळी वेफर्सचा व्यवसाय करणाऱ्या सोनल नितीन पारधी आणि कृषी क्षेत्रातील तेजश्री सुशिलकुमार साळुंखे यांचा समावेश होता.
हे देखील वाचा: पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; सुलभा उबाळेंचा शिंदे गटात पक्ष प्रवेश
यावेळी महिला संचलित विविध संस्थांचाही गौरव करण्यात आला. जिजामाता पतसंस्थेचा गौरव संस्थापिका राजश्रीताई बोरकर यांनी सहकारी महिलांसमवेत स्विकारला. तसेच, इंद्रधनु ग्रुप, श्री आदिशक्ती महिला प्रतिष्ठान, इनरव्हील क्लब, चैतन्य हास्ययोग मंडळ, जयहिंद शैक्षणिक संकुल, श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री उमाजी दगडूजी तांबे अॕसेंट स्कूल, श्रीमती एस.आर. केदारी बालकमंदिर यांना देखील सन्मानित करण्यात आले. याशिवाय, नारायणगाव पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
रोटरी क्लब नारायणगावच्या कार्याचे कौतुक करत प्रमुख अतिथी रो. मंजू फडके यांनी महिलांनी इतर जबाबदाऱ्या पार पाडताना स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवला पाहिजे. यामुळे त्यांना स्वतःचा आनंद मिळवता येईल आणि ते महिलांना स्वकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी प्रदान करतात, असे ते म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष हेमंत महाजन यांनी केले. सूत्रसंचालन क्लबच्या सदस्य डॉ. सीमा जाधव व डॉ. केतकी काचळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रिया घोडेकर यांनी केले.
रोटरी क्लब नारायणगावच्या सर्व सभासद व महिला भगिनींनी कार्यक्रमाच्या आयोजनात आपले योगदान दिले.











