बैलांना बॅटरीचा करंट दिला; निघोटवाडीतील धक्कादायक घटना उघडकीस
पुणे:आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडीमधील बैलगाडा घाटात बैलांना बॅटरीचा करंट देऊन पळविण्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शर्यतीसाठी बैलांना उत्तेजित करण्यासाठी या प्रकाराचा वापर करणाऱ्यांना आंबेगाव तालुक्यातील कुठल्याही घाटात शर्यतीसाठी उतरू देणार नाही, असा कडक निर्णय आंबेगाव तालुका अखिल भारतीय यात्रा कमिटीने घेतला आहे.
बैलगाडा घाटात बैलांना जोरात पळवण्यासाठी किंवा बारी बसवण्यासाठी काही बैलगाडा मालकांनी बैलांना मारहाण करण्याचे, उत्तेजक द्रव्य पाजण्याचे, तसेच इंजेक्शन देण्याचे प्रकार केले आहेत. याचप्रमाणे, आता काही बैलगाडा मालक बॅटरीचा करंट देऊन बैलांना पळवित असल्याचे समोर आले आहे. निघोटवाडी येथील एका बैलगाडा मालकाने बॅटरीचा करंट देऊन बैलांना पळवले. या वेळी, स्वयंसेवकांनी त्या घटनेचा चाेक केला आणि अखिल भारतीय यात्रा कमिटीचे पदाधिकारी आक्रमक झाले.
काही बैलगाडा मालक, केवळ स्वतःच्या नावासाठी आणि घाटात बारी बसवण्यासाठी बैलांना उत्तेजक इंजेक्शन्स देतात, असे प्रकार असणे अत्यंत चुकीचे आहे. जर डॉक्टर असे इंजेक्शन्स देत असतील, तर त्यांनाही त्यांची जबाबदारी घेतली जाईल. बैलगाडा एक जुनी आणि महत्त्वाची परंपरा आहे. त्याचे संरक्षण करणं आवश्यक आहे, असे आवाहन पुणे जिल्हा बैलगाडा चालक- मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयसिंग एरंडे यांनी केले.
हे देखील वाचा: धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना सुपूर्द, सागर बंगल्यावर पीए मार्फत
बॅटरीने बैलांना करंट देणाऱ्या बैलगाडा मालकाला त्याचे गाडे इनामात घेतले नाही आणि त्याचे सेकंदही पुकारले नाहीत. असे कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशारा माजी सरपंच शिवाजीराव निघोट यांनी दिला.
रामकृष्ण टाकळकर, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे प्रमुख, यांनी सांगितले की, बैलांना चांगला आहार देत आणि त्यांची योग्य काळजी घेत, बैलगाडा मालकांनी स्वतःचे नाव कमवावे. अशा प्रकारचे अत्याचार करण्यापेक्षा प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे.












